बडनेऱ्यात विपुलच्या अचानक मृत्यूने हळहळ, २७ वर्षीय तरुणांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
बडनेरा : येथील नवीवस्तीच्या पवननगर स्थित रहिवासी असलेला २७ वर्षीय तरुण विपुल अनिल कोल्हे हा त्याच्या गुणवत्तेवर कमी वयात सातासमुद्रापलीकडे नोकरीसाठी गेला. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. परंतु, लंडनहून दोन्ही देशातील आदान-प्रदान हे सोपस्कार आटोपल्यानंतर तब्बल १८ दिवसांनंतर रंगपंचमीला त्याचे पार्थिव आई-वडिलांच्या सुपूर्द करण्यात आले.
येथील राजेश्वर युनियन हायस्कूलच्या प्राचार्य राजश्री कोल्हे व सेवानिवृत्त शिक्षक अनिल कोल्हे यांचा विपुल मुलगा होता. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण राम मेघे महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुण्याच्या एका कंपनीने त्याच्या गुणवत्तेच्या आधारे त्याला लंडनला नोकरीसाठी पाठविले. तथापि, १२ मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लंडनच्या नॉर्थ स्लॉग बर्कशायर या शहरात राहत्या घरी मृत्यू झाला. त्याच्या मित्राने मृत्यूची वार्ता आई-वडिलांना कळविली. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनी धूलिवंदनाच्या दिवशी विपुलचे पार्थिव विशेष एअरलाईन्सने मुंबई विमानतळावर आणल्या गेले. त्यानंतर ॲम्बुलन्सद्वारे बडनेरा येथे विपुलचे पार्थिव आणले. २९ मार्च रोजी धूळवडीच्या दिवशीच विपुलच्या पार्थिवावर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विपुलच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात आली. युनायटेड किंग्डम्स येथे एखादा मृतदेह दुसऱ्या देशात पाठवायचा असेल, तर त्याच्या संपूर्ण सोपस्कारासाठी एवढा अवधी लागतोच, असे मत विपुलच्या वडिलांचे आहे. त्याच्या अचानक निधनाने आई-वडिलांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सुस्वभावी अत्यंत हुशार म्हणून विपुलची ओळख शहरात होती.
-----------
भारत आणि लंडन परराष्ट्र मंत्रालयात झाले आदान-प्रदान
युनायटेड किंगडममध्ये मृतदेह दुसऱ्या देशात पाठविण्यासाठी बऱ्याच बाबी पूर्ण कराव्या लागतात. शवविच्छेदन झाल्यानंतर तेथील पोलीस तसेच इंडियन एम्बेसीची परवानगी घ्यावी लागली. ट्रॅव्हलिंग यासह इतरही काही सोपस्कार पूर्ण करावे लागले. भारत आणि लंडन परराष्ट्र मंत्रालयात आदान-प्रदान झाले. त्यानंतर विपुलचे पार्थिव बडनेरा येथे आणण्यासाठी १८ दिवसांचा अवधी लागला. यापेक्षाही अधिक दिवस मृतदेह मिळण्यासाठी लागते, अशी माहिती आहे.