खासगी संस्थेकडे जबाबदारी : पुढील महिन्यात करारनामा लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मागील २८ वर्षांपासून लालफितसहित अडकलेल्या कै. सावित्रीबाई फुले सुतिकागृहाचा वनवास संपुष्टात आला आहे. कर्मचारी आणि सुविधांच्या प्रतीक्षेत पांढरा हत्ती ठरलेल्या बडनेऱ्याच्या या सुतिकागृहात लवकरच २५ खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन लवकरच एका खासगी संस्थेशी करारनामा करणार आहे. बडनेरा शहर व आजुबाजुच्या खेड्यांमधील प्रसूती रुग्णांसाठी जुनीवस्ती बडनेरा भागामध्ये कै. सावित्रीबाई फुले सुतिकागृह उभारून तयार आहे. त्या ठिकाणी प्रसूती विभागाकरिता नव्याने विविध संवर्गाकरिता २२ कर्मचाऱ्यांच्या जागा निर्माण करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी आवश्यक आहे. मात्र १९९९ पासून मंजुरी प्राप्त न झाल्याने सुतिकागृहाची इमारत बंद अवस्थेत आहे. त्याअनुषंगाने हे सुतिकागृह सेवाभावी संस्थेला चालवायला देण्याबाबत २०१४ पासून पाठपुरावा करण्यात आला. त्याअनुषंगाने प्रस्ताव मागविण्यात आले. त्यापैकी सरस्वती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेनी दिलेला प्रस्तावाला स्थायी व आमसभेने मंजुरी दिल्याने हे २५ खाटांचे सुतिकागृह कार्यान्वित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. लवकरच याबाबत या संस्थेशी करारनामा करण्यात येवून त्यांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. कै. सावित्रीबाी फुले सुतिकागृह, जुनीवस्ती बडनेरा येथील हॉस्पिटल स्वयंसेवी संस्थेमार्फत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालविण्यासंदर्भात आयुक्त आणि सरस्वती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेमध्ये हा करारनामा होईल. या संस्थेला केवळ तीन वर्षांसाठी सुतिकागृह चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. या सुतिकागृहात सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत रुग्णांची तपासणी होईल तथा या सुतिकागृहामध्ये नॉर्मल आणि सिझेरियन डिलेव्हरीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
२८ वर्षांनंतर सावित्रीबाई फुले सुतिकागृह कार्यान्वित
By admin | Published: May 12, 2017 1:40 AM