अमरावती : पदवीधर मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला. लिंगाडे यांचा विजयी मतांचा कोटा ७५७ मतांनी कमी होता. बाद फेरी आटोपल्याने व त्यांना सर्वाधिक मते असल्याने भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर ते विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. ही प्रक्रिया तब्बल ३१ तास चालली.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ७ पासून सुरू झाली व तब्बल ३१ तासांनंतर निकालाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे चार व अपक्ष १९ असे एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. यासाठी ३० जानेवारीला १,०२,४०३ म्हणजेच ४९.६७ टक्के मतदान झाले. कमी झालेले मतदान हे महाआघाडीच्या पथ्यावर पडले. मतमोजणीत ९३ हजार ८५२ मते वैध, तर ८ हजार ७३५ अवैध ठरली. यामुळे विजयी मतांचा कोटा ४७ हजार १०१ निश्चित झाला. मतमोजणीत पहिल्या पसंतीची मते लिंगाडे यांना ४३३४०, रणजित पाटील यांना ४१,०२७ व वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकर यांना ४ हजार १८१ मिळाली. १३ उमेदवार मतांचा दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत लिंगाडे यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
आयोगाच्या मान्यतेनंतर निकाल
विजयी मतांचा कोटा एकाही उमेदवाराला न मिळाल्याने बाद फेरीत दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये २१ उमेदवारांचा दुसऱ्या क्रमांकाच्या मतांचा कोटा मोजणीनंतरही लिंगाडे यांना ४६,३४४ व डॉ. रणजित पाटील यांना ४२,९६२ मते मिळाली. विजयी मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने भारत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली व त्यांच्या मान्यतेनंतर अंतिम दोनमध्ये सर्वाधिक मते असणारे धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्यात आले.