परतवाडा: लगतच्या कांडली ग्रामपंचायत अंतर्गत महावीरनगरमधील १४ वर्षीय मुलगा तब्बल ७२ तासानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना सुखरूप मिळाला. परतवाडा पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉडच्या कर्मचाऱ्यांना तो कांडलीतील जुनी वस्ती परिसरात फिरताना आढळला. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याच्या बयानानंतर त्याचे अपहरण झाले होते की आणखी काही, हे कळणार आहे.
तक्रारीनुसार, स्वप्निल (१४) असे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ नंतर बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव. त्याच्या आईने याबाबत १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी परतवाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, स्वप्निल हा १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्याच्या कार्तिक नामक मित्रासोबत फिरायला गेला होता. मात्र रात्री १० वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने त्याची आई सैरभैर झाली. आजूबाजूसह नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा शोध न लागल्याने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली. आपल्या मुलाला अज्ञात इसमाने पळून नेले असावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. दरम्यान, स्वप्निलचा एक मित्र व त्याची आई माहिती लपवत असल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला होता. त्याच्या शोधार्थ दोन पथके गठित करण्यात आली होती. त्यापैकी डीबी स्कॉडमधील उपनिरीक्षक मनोज कदम, सचिन भालेराव, जयसिंह चव्हाण, कमलेश मुरई व विवेक ठाकरे यांच्या पथकाला तो शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान कांडली परिसरात आढळून आला. तो सापडल्याची माहिती तातडीने त्याच्या आई-वडिलांना देण्यात आली.
कोट
मुलाच्या आईच्या तक्रारीवरून १८ फेब्रुवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गठित दोन पथकांपैकी डीबी स्कॉडला तो मुलगा शुक्रवारी कांडलीच्या जुनी वस्ती भागात मिळाला.
सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा