शेतकऱ्यांना न्याय : जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश बडनेरा : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव (बु.) गावातील शासकीय मालकीचे गायरान अवैधरीत्या बळकावून ती जागा विकल्याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. अडगाव या गावातील बहुतांश लोक दुग्ध व्यवसाय करतात. अमरावती व बडनेरा परिसरात अडगाव येथूनच दूध पुरवले जाते. अडगाव येथे १९११ सालापासून सुमारे ४८ एकर जागा गायरानसाठी आरक्षित होती. सन २०१३ साली काही लोकांनी अवैधरीत्या दस्तऐवजांमध्ये बदल करून ही जागा ताब्यात घेतली. लोकांवर दडपण आणले. शिवाय या शासकीय जागेचा सौदाही केला. तेव्हापासून गावकरी त्रस्त आहेत. गाई, म्हशी कुठे चारायच्या, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याच जागेत हिंदू आणि बौद्ध धर्मियांचे स्मशान आहे. तेही अवैधरीत्या जेसीबी लावून उद्ध्वस्त करण्यात आले. गावातील बौद्ध समाजाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्याचे अंत्यसंस्कार कोठे करायचे, हा प्रश्न गावात निर्माण झाला. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेतली. गायरानवरचे अतिक्रमण हटवून जागा गिळंकृत करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अतिक्रमण हटविण्याच आणि गायरानाला कुंपण घालून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या शिष्टमंडळात अडगावचे राहुल खडसे, सुनील लांजेवार, अरूण थोर, सचिन चोपकर, उमेश चोपकर, नितीन टेकरवाडे, मिलिंद पंतगराय, निखिल हायगले आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
अखेर अडगावच्या गायरानचा प्रश्न सुटला
By admin | Published: March 17, 2017 12:14 AM