कठोरातील घटना : सरपंचासह अन्य आरोपींना अटकेची मागणीअमरावती : नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कठोरा गांधी गावात २९ जानेवारी रोजी दोन गटात हाणामारीची घटना घडली. यात एका वृध्द महिलेसह चार जण जखमी झाले होते. यातील वृध्द महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान इर्विन रुग्णालयात मृत्यू झाल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर रोष व्यक्त करीत मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा, तसेच मुख्य आरोपी संरपच व अन्य आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली. सूत्रानुसार, कठोरा गांधी येथील रहिवासी माधव कांबळे यांचे सरपंच अजय जवंजाळ याच्याशी २८ डिसेंबर २०१४ रोजी रात्री ८.३० वाजता घरकुलाच्या हप्त्यावरून वाद झाला. दोंघामध्ये झालेल्या हाणामारीत माधव कांबळे व त्यांचा भाचा जखमी झाले होते. या घटनेची तक्रार नांदगाव पोलिसांकडे माधव कांबळे यांनी केली होती. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला तेव्हापासून माधव कांबळेचा सूड घेण्याच्या प्रयत्नात संरपच होता, असा आरोप माधव कांंबळे यांनी केला. त्यानंतर २९ जानेवारी रोजी माधव कांबळे व कमलाबाई वानखडे कुटुबीयासोबत शेकोटीजवळ बसले होते. त्यावेळी प्रफुल्ल जवंजाळ याने शेकोटीजवळ बसलेल्या नागरिकांसोबत वाद उपस्थित केला. त्यावेळी दोन्ही गट समोरा-समोर झाल्याने हाणामारी झाली. त्यामध्ये एका गटातील कमला अमृत वानखडे, माधव कांबळे, विनोद चव्हाण व दुसऱ्या गटातील शिवा आनंद जवंजाळ व प्रफुल्ल जवंजाळ असे पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तणावसदृश स्थितीवर नियंत्रण मिळविले होते. या हाणामारीतील जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिवा जवंजाळ याला नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या कमला अमृत वानखडे यांचा बुधवारी मृत्यू झाल्याने पुन्हा वाद उफाळून आला. कमला वानखडे यांचे नातेवाईक व काही नागरिकांनी इर्विनच्या शवविच्छेदन गृहासमोर रोष व्यक्त केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी संरपच व अन्य आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. तणावाची स्थिती निर्माण होऊ नये याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त जी.एस.साखरकर यांच्यासह पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनीही इर्विनला भेट देऊन नातेवाईकांशी चर्चा केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)
जखमी वृद्धेच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये उफाळला रोष
By admin | Published: February 04, 2015 11:05 PM