अमरावती, दि. 15- राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. एक सदस्य वगळता सर्व उमेदवार निवडून आले आहे.गुरूवारी येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील मतदान केंद्रात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत मतदान झाले.
यामध्ये १०३६ पैकी ८९९ मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. रात्री ९ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. रात्री १२ चे दरम्यान पहिला निकाल हाती आला. यात परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. सर्वप्रथम सदस्य पदासाठी मतमोजणी झाली यामध्ये अॅड शेळके पॅनेलचे अशोक ठुसे (२८७) वगळता परिवर्तन पॅनेलचे हेमंत काळमेघ (४८७), केशवराव गांवडे (३२७), केशवराव मेटकर (३२७) विजयी झाले व येथुनच आजीवन सदस्यांना संस्थेत यावेळी परिवर्तन हवे असल्याचे स्पष्ट झाले.
अध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन देशमुख (४६८) यांनी विद्यमान अध्यक्ष अरुण शेळके यांचा पराभव केला. कोषाध्यक्षपदी दिलीप इंगोले (४८५), उपाध्यक्षपदी नरेशचंद्र ठाकरे (४७४), रामचंद्र शेळके (३७१), गजानन पुंडकर (३५१) मोठ्या फरकाने विजयी झाले. दशकानंतर संस्थेत सत्तापरिवर्तन झाले आहे.