लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भेंडीपाठोपाठ अचलपूरची गवार आणि बरबटी बहरीन या आखाती देशात येथे पाठविली गेली, तर लोणच्याच्या कैरीसह दुधी भोपळा, तोंडली ही भाजीसुद्धा दोहा या अन्य देशात विक्री करण्यात आली आहे.तालुक्यातील वाढोणा येथील राजेंद्र बोंडे यांच्या शेतातील ३०० किलो गवार आणि बिलनपुरा येथील वसंत सातरोटे यांच्या शेतातील बरबटीच्या दीडशे किलो शेंगा पाठविण्यात आल्या. या गवार आणि बरबटीच्या शेंगा ३० रुपये किलोने निर्यातदार कंपनी ‘ईवा’ने खरेदी केल्या आहेत. या शेंगा नेटच्या बॅगमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. गवार, बरबटी अचलपूरमधून निर्यात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रीतेश पोटे यांच्या शेतातील या काकडीने सर्व सरकारी चाचण्या उत्तीर्ण केल्या. मात्र, त्याची माहिती उशिरा प्राप्त झाल्याने कृषी समृद्धी उत्पादक कंपनीचे रवि पाटील यांना मिळाल्यामुळे भेंडी, गवार, चवळीसोबत काकडीची पाठवणी होऊ शकली नाही.
आखाती देशांमध्ये शेवग्याच्या शेंगेलाही मागणीअमरावती जिल्हा फळे व भाजीपाला निर्यातदार संघ, ‘ईवा’ नामक निर्यातदार कंपनी, कृषी समृद्धी उत्पादक कंपनीचा पुढाकार आणि जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांचे सहकार्य या निर्यातीला कारणीभूत ठरले आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून अचलपूरचा शेतकरी देशाचे प्रतिनिधित्व आखाती देशांमध्ये करीत आहेत. दरदिवशी पाच टन शेवगा शेंगेचीही मागणी आहे. मात्र, तालुक्यात सध्या शेवग्याच्या शेंगा नाहीत.