बडनेरा : जिल्ह्यात सर्वांत मोठा बाजार म्हणून ओळख असणाऱ्या बडनेरातील गुरांचा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी पहिल्यांदा भरला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल सहा महिने तो बंद होता. मात्र, जेमतेम खरेदीदार व विक्रेते असल्याने नेहमी गजबजलेला बाजार रिकामा पाहावयास मिळाला. उलाढाल नगण्यच होती.
अमरावती कृषिउत्पन्न बाजार समिती अंतर्गत बडनेरा येथे गुरांचा बाजार दर शुक्रवारी भरतो. बाजारात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानसह इतर राज्यांतील जनावरे विक्रीसाठी आणली जातात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून हा बाजार बंद होता. पहिल्या लाटेनंतर शिथिलता मिळाल्याने हा बाजार जेमतेम दोन ते तीन महिने सुरू होता. त्यानंतर दुसरी लाट आली. २२ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडॉउन लागल्याने बाजार पुन्हा बंद करण्यात आला. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर २७ ऑगस्टला हा पहिलाच बाजार भरला. या बाजारात जनावरे कमी होती उत्तर प्रदेशातून म्हशी आणल्या होत्या. जवळपास खेड्यांवरील खरेदीदार व विक्रेते हजर होते. जेमतेम उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे विभागप्रमुख किरण साबळे यांनी सांगितले.
---------------------
सर्वांनाच आर्थिक फटका
गुरांचा बाजार बंद असल्याचा आर्थिक फटका बाजाराशी संबंधित सर्वांनाच बसला आहे. अजून बाजारात पूर्वीप्रमाणे रौनक येण्यास बराच अवधी लागू शकतो, अशा प्रतिक्रिया येथे आलेल्यांमध्ये होत्या. कोरोनाचा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे पावसाळा सुरू होण्याआधी बाजारात मोठी उलाढाल होत असते. गेल्या दोन वर्षांपासून अगदी हंगामातच बाजार बंद होता.