अमरावती : १०० दिवसांचे पीक असणाऱ्या सोयाबीनचा कालावधी संपल्याने पिवळे होऊन नैसर्गिकरीत्या करपायला लागले आहे. अशा परिस्थितीत शासनाने येलो मोझॅक, खोडकूज व मूळकूज बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोंगणीच्या स्थितीतील सोयाबीनचे पंचनामे कसे करावेत, हा पेच कृषी विभागासमोर उभा ठाकला आहे.
ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड व त्यात ‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडून करपायला लागले आहे. यासह खोडकूज, मूळकूज या रोगांचाही प्रादुर्भाव पिकावर झालेला आहे. यासाठी पीक विम्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्राधान्याने पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दिले आहेत व याअनुषंगाने महसूल विभागाने ९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन बाधित सोयाबीनच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात किमान ३० ते ४० हजार हेक्टरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. तसे पाहता सर्वच तालुक्यांतील सोयाबीन या रोगामुळे काही प्रमाणात पिवळे पडले असल्याच्या शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी आहेत. मात्र पंचनाम्याचे आदेश उशिरा आल्याने संयुक्त पंचनाम्यासाठी यंत्रणांसमोर पेच निर्माण झालेला आहे.सोयाबीनचा १०० दिवसांचा कालावधी पूर्ण
सोयाबीन पीक हे साधारणपणे ९५ ते १०० दिवसांचे गृहीत धरण्यात येते व पेरण्यांना उशीर झाला असला तरी बहुतेक भागांत पिकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे व पीक नैसर्गिकरीत्या पिवळे पडून करपायला लागले आहे. त्यामुळे बाधित पीक कोणते?, हे लक्षात येत नाहीत, शासनाचा उद्देश जरी चांगला असला तरी उशीर झाल्याने फारसे साध्य होणार नसल्याचे चित्र आहे.