अमरावती : टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांत महसूलसह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पाणीटंचाईच्या बैठकीत दिले होते. याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मंगळवारी मेळघाटातील खडीमल गावात स्पाॅट व्हिजिट देत तेथील पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली.जिल्हाभरातील आठ गावांमध्ये ११ टँकरने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईची आढावा बैठक घेतली होती. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकरने योग्यरीत्या पाणीपुरवठा होतो किंवा नाही, याबाबत शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. झेडपीचे सीईओ संतोष जोशी यांच्यासमवेत खडीमलला झेडपी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, चिखलदरा येथील पंचायत समितीचे बीडीओ व उपअभियंता उपस्थित होते. तेथील आदिवासी बांधवांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला व उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने आवश्यक सूचनाही जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर टँकरग्रस्त खडीमल गावांत सीईओंची स्पॉट व्हिजिट, टंचाईच्या व्यथा घेतल्या जाणून
By जितेंद्र दखने | Published: May 08, 2024 8:56 PM