अमरावती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्या पक्षातील, मित्रपक्षातील आणि काही अपक्ष आमदारांच्या साथीने भाजपासोबत सत्तास्थापना केली. शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण त्यात शिंदेंना पहिल्यापासून साथ देणाऱ्या 'प्रहार' संघटनेचे बच्चू कडू यांची वर्णी लागली नाही. याबाबतची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. पण नंतर, एकनाथ शिंदेंनी दुसऱ्या विस्तारात आपल्याला मंत्री करण्याचा शब्द दिलाय अशी सारवासारवही केली. मात्र, आता पुन्हा एकदा मंत्रीपदाच्या प्रश्नावरुन बच्चू कडूंची नाराजी दिसून आली आहे.
शिंदे गटातील अनेक आमदारांसह आता बच्चू कडू यांनाही मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. कारण, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तार बच्चू कडूंना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचं दिसून आलं. काहीवेळा जाहीरपणे त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली. आता, पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता त्यांची नाराजी दिसून आली. मी काय प्रमुख आहे का? असा प्रतिप्रश्नच आमदार कडू यांनी पत्रकारांना केला. आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता होईन नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन, असं नाराजीच्या सुरातलं उत्तर बच्चू कडू यांनी दिलं.
शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालंय
अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वेळा आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे, पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात विचारणा केली असता, बच्चू कडू यांनी मीडियावरच आगपाखड केल्याचं दिसून आलं, तुम्ही पाहत नसेल माझ्याकडे चला, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दाखवतो, तुम्ही माहिती घेत नाही संशोधन केलं पाहिजे पत्रकारांनी. किती जणांच्या खात्यात पैसे आले ते तुम्हाला दाखवून देतो. दोन दिवस अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, असा दावा बच्चू कडू यांनी केला.