अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख माघारला असताना कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. बुधवारी पुन्हा सहा संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रुग्णांची संख्या ६४१ झाली आहे. याशिवाय ३८१ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४६,६५५ झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी ५,१८८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८१ नमुने पॉझिटिव्ह नोंद झाले. ही पॉझिटिव्हिटी सात टक्क्यांपर्यंत आहे. चाचण्यांमधली ही अलीकडची सर्वांत नीचांकी पॉझिटिव्हिटी असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. तसे पाहता या पाच दिवसांत सात ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान पॉझिटिव्हिटी आली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न व नागरिकांची सकारात्मकता यामुळे आता कोरोनाग्रस्तांची संख्या घटली. मात्र, हे सातत्य टिकवूण ठेवणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सध्या पथकांच्या कारवाया थंडावल्यामुळे पंचसूत्रीचा नागरिकांना विसर पडला. यामुळे आस्थापनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.
बॉक्स
बुधवारी सहा रुग्णांचा मृत्यू
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरखेड येथील ५३ वर्षीय पुरुष, बडनेरा येथील ६५ वर्षीय महिला, खारतळेगाव येथील ७७ वर्षीय पुरुष, श्रीरामनगर (अमरावती) येथील ५५ वर्षीय, चिंचोली येथील ५१ वर्षीय पुरुष, हर्षराज कॉलनी, येथील ७८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.