अमरावती : जिल्ह्यात बुधवारी सहा कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६७४ झाली आहे. याशिवाय २५९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४८,६३५ झालेली आहे.
जिल्ह्यात बुधवारी २,३९९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २५९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात १०.८० टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आलेली आहे. या आठवड्यात पहिल्यांचा ११ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी पोहोचली आहे. याशिवाय सोमवारी धूलिवंदन सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वत्र उल्लंघन झाल्याने संसर्ग वाढणार काय, याचे चित्र येत्या चार ते पाच दिवसांत स्पष्ट होणार आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, गायत्री नगरातील ८६ वर्षीय पुरुष, मुझ्झफरपुरा येथील ६८ वर्षीय महिला, अर्जुननगरातील ६४ वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर येथील ५५ वर्षीय पुरुष, ब्राह्मणवाडा येथील ५० वर्षीय महिला व अंबाडा, येथील ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६७४ झालेली आहे.