महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चाकारवाईची मागणी : अवैध व्यवसायांवर अंकुश लावण्याचे आश्वासनमोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मोठा) येथील अवैध दारुविक्री तथा सट्टा व्यावसायिकांच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी दुपारी येथील महिलांनी एकत्र येऊन वसुधा बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्शी पोलीस ठाण्यात निवेदन दिले.पिंपळखुटा या ठिकाणी अनेक दिवसांपासून काही समाजकंटकांद्वारे अवैध दारुविक्री व सट्टा व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे तेथील सामान्य जनतेला प्रचंड त्रास होत आहे. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला वर्गांना त्याची मोेठ्या प्रमाणात झळ पोहोचत असून एसटी बस थांब्याजवळ हे सर्व प्रकार मोठ्या प्रमाणात चालत आहेत. यापूर्वी अनेकवेळा पोलीस ठाणे व एस.पी. ग्रामीण यांनासुध्दा तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवैध व्यावसायिकांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. पिंपळखुटालगतच्या ५-६ गावांमधील दारुविक्री बंद असल्याने येथील मद्यपीसुद्धा पिंपळखुटा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. तरी हे सर्व प्रकार तत्काळ बंद करण्यासाठी व येत्या २२ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकादरम्यान मोठा वाद टाळण्याच्या दृष्टीने शुक्रवारी येथील महिला वर्ग डॉ. वसुधा बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्शी पोलीस ठाण्यात येऊन धडकल्या व येथील ठाणेदार नीलिमा आरज यांना निवेदन देण्यात आले. पण जेव्हापासून ठाणेदार नीलिमा आरज रुजू झाल्या तेव्हापासून अनेक ग्रामीण भागातील दारू विक्रेत्यांना व जुगार खेळणाऱ्यांवर केसेस दाखल करुन त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र कठोर कारवाई न झाल्यामुळे दारु विक्रेत्यांची हिंमत वाढली असल्याचे दिसून येते. यावर तत्काळ अंकुश लावण्यात येईल, असे आश्वासन ठाणेदारांनी यावेळी निवेदनकर्त्यांना दिले. निवेदन देतेवेळी वसुधा बोंडे, सरपंच नीलेश पुरोहित, संजय आकोलकर, विठ्ठलराव उघडे, संजय देशमुख, संजय निकम, भाजपाच्या सदस्या ज्योती पेठे, माया बासुंदे, नीलिमा शाहू व शेकडो महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)
अवैध दारु विक्रीविरुद्ध
By admin | Published: April 18, 2015 12:09 AM