अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील व लोणी ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड सुमित सुनिल उमाळे (२२, रा. लोणी टाकळी, विठ्ठल रुख्माई प्लॉट) याच्याविरूध्द ‘एमपीडीए’ लावण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत १५ डिसेंबर रोजी आदेश पारित केले होते. त्यानुसार, त्याला जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. त्यामुळे पुढील एक वर्ष त्याचा मुक्काम तुरूंगात असेल.
सुमित उमाळे याच्याविरूध्द चोरी, सशस्त्र जबरी चोरी, सशस्त्र दहशत पसरविण्यासह मनाई आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या गुंडप्रवृत्तीमुळे त्याच्याविरूध्द कुणीही उघड तक्रार देण्यास कोणीही धजावत नव्हते. वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा त्याच्या वर्तणुकीवर काहीएक परिणाम झाल्याचे दिसून येत नसल्याने त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानुसार, जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार यांनी त्यास अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश गुरूवारी पारित केला. तो आदेश तामील करुन आरोपीला जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाईपोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, अंमलदार अमोल देशमुख तसेच लोणी येथील ठाणेदार मिलींद दवणे यांनी पार पाडली.जिल्हयात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहावी, याकरीता गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे व पोलिसांच्या कारवाईस न जुमानता दहशत पसरविणाऱ्या गुंड, सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यांच्याविरूध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.किरण वानखडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,