अमरावती : तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्यासाठी त्यांचे आईवडील ऊर्जास्त्रोत ठरले आहेत. वयाच्या मर्यादा असोत वा ऐनवेळी आप्तस्वकीयांनी केलेले कुठाराघात, कुठलेही अडथळे त्यांचे आत्मबळ मंदावू शकले नाहीत. वडील माझे राजकीय गुरू आणि माँ माझा आत्मविश्वास असे सांगणाऱ्या यशोमतींसाठी वडील भय्यासाहेब आणि आई पुष्पमालाताई यांचे अहोरात्र सुरू असलेले पडद्यामगील श्रम तरुणांनाही लाजविणारे आहेत.६६ वर्षीय भय्यासाहेबांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू होतो. ६ वाजता ते प्रचाराच्या नियोजनार्थ घराबाहेर पडतात. भय्यासाहेब प्रचाराची मुख्य धुरा सांभाळत आहेत. सकाळी प्रचाराची वाहने बाहेर काढणे नि त्यात इंधनाची व्यवस्था करण्यापर्यंतच्या बारीकसारीक कामापासून तर बड्या नेत्यांच्या आगमनाच्या तारखांची निश्चिती ते कार्यक्रम यशस्वी करण्यापर्यंतचे सर्वांगीण नियोजन भय्यासाहेबांच्या अनुभवी नजरेतून होते. ग्रामीण भाग असलेल्या तिवसा मतदारसंघातील मतदारांना आपुलकीने हाताळणे हे कौशल्यही त्यांना सांभाळावे लागते. भय्यासाहेब पूर्वी तिवस्याचे आमदार असल्यामुळे त्यांचा दांडगा लोकपरिचय आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ जितका यशोमतींना करून देता येईल तितका तो करून देण्याचा कटाक्ष भय्यासाहेब बाळगून असतात. प्रचाराचे नियोजन, नेत्यांची सभा, रोड-शो, पदयात्रा आदी प्रचारयंत्रणा सांभाळण्याचे कसब भय्यासाहेब हेच बघतात.
वयाच्या मर्यादा, आप्तस्वकीयांचा कुठाराघात तरीही कमालीचे आत्मबळ!
By admin | Published: October 12, 2014 11:28 PM