अमरावती : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवा पद्धतीने नियुक्ती करताना कमाल वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढून ३२ वर्षे केली आहे. यापूर्वी या पदासाठीची वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे होती. ती आता वर्षभरासाठी २१ ते ३२ वर्षे राहणार आहे. यासंदर्भातील आदेश एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो यांनी काढले आहेत.
एकात्मिक बालविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवा पद्धतीने नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबविताना या पदासाठी प्रामुख्याने विधवा, परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र, बऱ्याच ठिकाणी विधवा, परित्यक्ता यांचे वय या नियमात बसत नसल्याने त्याची नियुक्ती करण्यात अडचणी येत असल्याने शासनाकडे या वयोमर्यादेत वाढ करण्याची विनंती जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी महिला व बालविकासमंत्री यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन एकात्मिक बालविकास विभागाने वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला असून वयोमर्यादेत दिलेली वयोमर्यादेची शिथिलता ही केवळ ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या भरतीसाठी लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोट
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरतीच्या अनुषंगाने वयोमर्यादेत केलेली शिथिलता ही केवळ कोविड प्रादुर्भावामुळे पदभरतीस झालेल्या विलंबामुळे करण्यात आली आहे. याची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंतच आहे. याबाबतचे नुकतेच आदेश प्राप्त झाले आहेत.
-प्रशांत थोरात,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालकल्याण
डेप्युटी सीईओ