दिवसभर तणाव : केशव कॉलनीवासी ठाम, वाईन किंग्सचे दबावतंत्रअमरावती : दारूमुक्तीसाठी लढा उभारणारे केशवकॉलनीवासी बुधवारीही त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. नागरिक आणि ‘वाईन किंग्स’ दरम्यान दिवसभर चर्चेचा फड रंगला. मात्र, दुकान बंद करण्याच्या वेळेच्या मुद्यावर घोडे अडले. दारूविक्रेत्यांचे दबावतंत्र वाढत गेल्याने नागरिकही मानसिक तणावात आले होते. महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे मद्यविक्रेत्यांची गोची झाली आहे. मद्यपींची सुद्धा तारांबळ उडाली आहे. अंतर्गत वस्तीतील दारू दुकानांवर होणारी गर्दी आणि धोक्यात येणारी शांतता लक्षात घेता अंतर्गत वस्तीतील दारु दुकाने हटविण्याच्या मागणीला देखील जोर आला आहे. वस्तीतील दारू दुकाने बंद व्हावीत, यासाठी महिलांसह नागरिक एकवटले आहेत. त्यामुळे आता मद्यपींसह दारुविके्रत्यांची भंबेरी उडाली आहे. याच अनुषंगाने कॅम्प मार्गावरील केशवकॉलनीवासियांनी ‘क्लासिक कॉम्पलेक्स’मधील ‘आनंद लिकर्स’हे मद्यविक्रीचे दुकान हटविण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने लढा उभारला आहे. वास्तविक हा लढा मागील १५ वर्षांपासून सुरु आहे. मात्र, आजपर्यंत नागरिकांच्या मागणीची प्रशासनाद्वारे दखल घेतली गेली नाही. आता हायवेवरील दारूबंदीनंतर या दुकानामध्ये वाढता मद्यपींचा धुमाकूळ आणि निर्माण होणाऱ्या समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे हे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीला नवी धार आली आहे. परिणामी दारूमुक्तीसाठी केशव कॉलनीवासियांनी ‘आर या पार’चा लढा उभारला आहे. बुधवारी सकाळी केशवकॉलनीवासियांनी आनंद लिकर्ससमोर पुन्हा ठिय्या दिला. दुकानाचे संचालक भामोरे दुकान उघडण्यासाठी आले. एक्साईज विभागाला निवेदनअमरावती : मात्र, दुकानसमोरच शेकडो महिला ठाण मांडून बसल्यामुळे ते दुकान उघडू शकले नाहीत. त्यांनी महिलांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले. मात्र, महिलांसह नागरिक दुकान हटविण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे नाईलाजाने भामोरे यांना नमते घ्यावे लागले. शहरातील वाईन किंग, वाईन बार असोसिएशन व वाईन शॉप असोसिएशनचे लकी नंदा, अनिल भामोरे, नितीन मोहोड, अरूण जयस्वाल, नितीन हिवसे, गजानन राजगुरे, गोपीचंद भामोरे आदी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा सुरू केली. दरम्यान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. प्रदीर्घ चर्चेनंतर केशवकॉलनीवासियांनी दुकान सुरू ठेवण्यास होकार दर्शविला. मात्र, त्यासाठी सुरक्षा गार्ड, सीसीटीव्ही, पार्किंगची व्यवस्था, सरंक्षण भिंत व वेळेचे बंधन असे सहा मुद्दे ‘वाईन किंग्स’ समोर ठेवण्यात आले. हे सहा मुद्दे मान्य असल्यास मद्यविक्रीचे दुकान सुरू करता येईल, असे मत नागरिकांनी मांडले. मात्र, दुकान बंद करण्याच्या वेळेच्या मुद्यावर चर्चा फिस्कटली. दारूविक्रेत्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दारु दुकान सुरु ठेवण्याचा मुद्दा लाऊन धरला तर केशवकॉलनीवासियांनी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंतच दारु दुकान सुरु ठेवण्याचा मुद्दा रेटून धरला. तासभराच्या चर्चेनंतरही यावर तोडगा निघाला नव्हता. अखेर पुन्हा बैठक घेऊन वेळेच्या बंधनाविषयी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या संगीता पवार यांनी केशव कॉलनीतील नागरिकांची भेट घेतली. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी प्रभारी निरीक्षक गजानन शिरसाग, दुय्यम निरीक्षक अरविंद गगणे, सहायक दुय्यम निरीक्षक अशोक जयस्वाल यांना निवेदन दिले. ७० टक्के ‘धंदा’ तुमचाचचर्चा सुरु असताना वेळेच्या बंधनावर घमासान चर्चा झाली. दरम्यान वाईन बार असोसिएशनचे पदाधिकारी नितीन मोहोड यांनी मद्यविक्रेत्यांची बाजू मांडताना सायंकाळी दुकान बंद करण्याच्या वेळेमुळे ७० टक्के व्यवसाय बुडित होण्याचे वेगळ्या शैलीत सांगितल्याने हास्याचे फवारे उडाले. दारूविक्रेत्यांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्याचा मुद्दा रेटून धरला तर महिलांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दुकान उघडे ठेवण्यावर भर दिला.कॉम्पलेक्समधील दुकानदारांचा पाठिंबाकेशवकॉलनीवासियांच्या या लढ्यात आतापर्यंत क्लासिक कॉम्पलेक्समधील दुकानदारांनी सहभाग घेतला नव्हता. मात्र, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी या दुकानदारांनी केशव कॉलनीवासियांना पाठिंबा देण्याचे ठरविले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी एक दिवस दुकाने बंद ठेवण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शविली. विरोध केल्यास दिला जातो मन:स्तापमद्यविक्री दुकानाला कॉम्पलेक्समधील व्यापाऱ्यांनी विरोध केला तर मध्यरात्रीतून त्या दुकानसमोर घाण किंवा फुटलेल्या काचेच्या बाटल्या आणून टाकल्या जात. काही महिन्यापूर्वी एका दुकानदाराने दारु दुकानाला विरोध केला असता त्याच्या दुकानासमोर दगड व काचेच्या फुटलेल्या बाटल्या आणून त्रास दिला गेला होता.खिसेकापू झाले सक्रियशहरातील बहुतांश दारु दुकाने बंद झाल्यामुळे केशवकॉलनीतील या दुकानात मद्यपींची गर्दी वाढली होती. यागर्दीचा फायदा घेऊन खिसेकापू सुद्धा सक्रिय झाले होते. यामुळे दुकानदारांना देखील फटका बसला होता. सीपी जाम भडकले, संगीता पवार पोलीस ठाण्यातकेशव कॉलनीवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला बुधवारी वेगळे वळण मिळाले. केशव कॉलनीवासियांनी दिवसभर ‘वाईन अॅन्ड बार असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काही अटी व शर्तींवर दारु दुकान सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान ‘दारुबंदी, व्यसनमुक्ती आंदोलना’च्या प्रणेत्या संगीता पवार यांनी केशव कॉलनीतील आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांना पाठिंबा दिला. तासभराच्या चर्चेनंतर संगीता पवार व उमेश मेश्राम यांच्या नेत्तृत्वात नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. दरम्यानच वाईन अँड बार असोसिएशनचे काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. दारु दुकानाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान केशव कॉलनीतील नागरिकांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेण्यास पोहोचले. पोलीस आयुक्तांसमोर भूमिका मांडत असताना अचानक संगीता पवार यांच्यावर सीपी जाम भडकले. संतापामुळे त्यांचा वाचेवरील ताबा सुटला आणि काही अपशब्दांचा उच्चार त्यांनी केला. सीपींनी अशा शब्दांत संताप व्यक्त केल्यानंतर शिष्टमंडळ तेथून बाहेर पडले. पश्चात संगीता पवार व त्यांचे सहकारी उमेश मेश्राम यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठले. वृत्त लिहिस्तोवर पवार व मेश्राम यांची पोलिसांशी चर्चा सुरू होती.
दारूबंदीचे आंदोलन चिघळले
By admin | Published: April 27, 2017 12:04 AM