अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ असलेल्या आदिवासी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना डीबीटीचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. तसेच वसतिगृहातही आवश्यक सोयी-सुविधा नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील सर्वच आदिवासी वसतिगृहांतील शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी अपर आदिवासी विकास विभाग कार्यालय गाठून आंदोलन केले. परंतु, सकाळी ११ वाजता कार्यालयात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची दुपारी ४ पर्यंतही अधिकाऱ्यांनी विचारपूस केली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे; परंतु, शहरातील आदिवासी वसतिगृहाची स्वत:ची इमारत नसून भाड्याच्या इमारतीमध्ये ही वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांमध्ये आवश्यक सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वसतिगृहातील समस्यांसंदर्भात आदिवासी विकास विभागाला वारंवार अवगत करूनही संबंधित अधिकारी वर्ग कोणतीही दखल घेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, १० विद्यार्थ्यांमागे एक काॅम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु, वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या डीबीटीचे पैसेही अजूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पडलेले नाहीत. त्यामुळे या सर्व मागण्यांना घेऊन पुन्हा एकदा शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी अपर आदिवासी विकास विभाग गाठून आंदोलन केले. परंतु, या आंदोलनानंतरही विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अमरावती ते धारणी आदिवासी प्रकल्प कार्यालयापर्यंत पायदळ मार्च काढण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.