अमरावती : गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या स्थानिक इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. या आगीत सुमारे ४८ फळ विक्रीच्या दुकानांची राखरांगोळी झाली आहे. यामध्ये व्यापार्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या भीषण आगीत जिवीत हानी टळली. इतवारा बाजारात परिसरातील मुर्गी गल्लीत फळ विक्रीचे होलसेल मार्केट आहे. तेथे हापुस आंबा, टरबुज, खरबुज, अननस, अंगुर इत्यादी फळांची होलसेल विक्री केली जाते. या मार्केटमधील फळ विक्रीच्या दुकानांना बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केल्याने ही आग सर्वत्र पसरुन तेथे मोठा अग्नितांडव सुरु झाला. परिसरात पहाटे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांचे याकडे लक्ष जाताच त्यांनी घटनेची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिली. शहर कोतवालीचे पोलीस निरीक्षक विजय साळुंखे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी १८ बंबाच्या साहायाने तब्बल तीन तासाने आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत सुमारे ४८ दुकानांची राखरांगोळी होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले. हापूस आंबा जळून खाक भीषण अग्नितांडवात फळ मार्केटमधील दुकानातील संपुर्ण साहित्य व फळे जळून खाक झाली. यामध्ये शेख शकील यांच्या दुकानातील सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या हापुस आंब्यासह प्लास्टिकचे कॅरेट जळून खाक झाले. शेख शकीलचे आगीत सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती तेथील काही प्रत्यक्षदश्री व्यापार्यांनी दिली. ३0 हातगाड्यांची राखरांगोळी इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत दुकानांसह तेथे ठेवलेल्या काही विक्रेत्यांच्या जवळपास तीस हातगाड्यांचीही राखरांगोळी झाल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. अग्निशमन दलाविरुध्द रोष फळ मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती व्यापार्यांना मिळताच व्यापार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना दुरध्वनीवर कळविले. परंतु वाहन चालक उपलब्ध नाही अशी कारणे देऊन कर्मचार्यांनी पुर्वी घटनास्थळी पोहचण्यास नकार दिला. अखेर काही संतप्त व्यापार्यांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयावर धाव घेतल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली, असा आरोप करुन व्यापार्यांनी संताप व्यक्त केला.
इतवारा बाजार परिसरात अग्नितांडव
By admin | Published: May 29, 2014 1:30 AM