कृषिमंत्री फुंडकर यांची घोषणा : डॉ.पंजाबराव देशमुख पुण्यतिथी सोहळा, पंचाहत्तरी पार केलेल्या सभासदांचा सन्मानअमरावती : कृषी व शिक्षण क्षेत्रात जगात ज्यांची महामानव म्हणून ओळख आहे अशा डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे पुढील सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या ५२ व्या पुण्यतिथी सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचा ५२ वा पुण्यतिथी सोहळा श्री शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळा मेन ब्रन्च येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके हे होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, सुरेश ठाकरे, कोषाध्यक्ष ह. भा. ठाकरे, सचिव वि.गो. भांबुरकर, कार्यकारिणी सदस्य गजाननराव पुंडकर, जगन्नाथ वानखडे, प्रा. अरुण सांगोळे, प्राचार्य व्ही. जी. ठाकरे, आर. आर. सावरकर, अरुण मंगळे व श्रीमती कमलताई गवई यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात अॅड. शेळके यांनी आपल्या १० वर्षांच्या विकासात्मक कार्याचा आढावा वाचला. फुंडकरांनी कृषी महाविद्यालयाची घोषणा करून ताबडतोब अंमलबजावणी केल्यामुळे शेळके यांनी आभार मानले. ७५ वर्षे पूर्ण केलेल्या आजीवन सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तीन नवीन इमारतींचे उद्घाटन फुंडकरांच्या हस्ते झाले. यामध्ये ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर, शिवाजी विज्ञान महाविद्यालय सर व्ही. व्ही. रमण सभागृह व शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचा समावेश आहे. प्रास्ताविक उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन सचिव वि.गो. भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाला शिव परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पापळला येत्या सत्रापासून कृषी महाविद्यालय
By admin | Published: April 11, 2017 12:27 AM