अमरावती : राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी संत्रा प्रक्रिया उद्योगासह एफपीओंच्या उद्योगाला भेटी दिल्या. यादरम्यान बारगाव (ता. वरूड) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक कृषी सहायकाबाबत तक्रारी जास्त होत्या. त्यामुळे गेडाम यांनी विभागीय कृषी सहसंचालकांना सदर कृषी सहायकाच्या निलंबनाचे आदेश दिले.
संबंधित कृषी सहायक मुख्यालयी राहत नाही व सहकार्य करीत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. याशिवाय कृषी आयुक्तांच्या दौऱ्यादरम्यान ते उपस्थित नव्हते, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार कृषी सहसंचालकांनी शुक्रवारी संबंधित कृषी सहायक विजय गावंडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील देवठाण- सालबर्डी येथील नव्या ऑरेंज प्रोसेसिंग प्रकल्पाला कृषी आयुक्तांनी भेट दिली व नव्या ऑरेंज प्रोसेसिंग प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कृषी सहयोग शेतकरी उत्पादक कंपनीला भेटआसेगाव पूर्णा येथील कृषी सहयोग शेतकरी उत्पादक कंपनीला कृषी आयुक्तांनी भेट दिली. कंपनीचे स्थानिक पातळीवरील महत्त्व, फायदे याबाबत कंपनीचे संचालक नीलेश खोंडे संचालक यांनी माहिती दिली व पोकरामधून लाभ घेतलेल्या व स्मार्टमधून मंजूर झालेल्या बाबींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कृषीचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.