अमरावती : ‘विकेल ते पिकेल’ अभियान राबविताना कृषी मालाच्या विपणनाची साखळी निर्माण करा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत (पोकरा) विभागात काम होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे. अजूनही अनेक गावांत ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना झाली नाही. ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी दिले.
विभागीय कृषी आढावा बैठक कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली. यावेळी आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान व पाचही जिल्ह्यांतील कृषी अधिकारी उपस्थित होते.
पाचही जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी २२९ कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे. याबाबत जिल्हाधिकारी स्तरावरून याचा पाठपुरावा करावा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनेत (स्मार्ट) अधिकाधिक प्रस्ताव प्राप्त करून घ्यावेत व १५ मार्चपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करावे. कृषी कार्यालयांत शेतकरी सन्मान कक्ष स्थापन झाले किंवा कसे, याचा प्रत्यक्ष पडताळा घ्यावा, असे कृषिमंत्री म्हणाले.
खारपाणपट्ट्यात शेततळ्यांना प्राधान्य
खारपाणपट्ट्यात जलसंधारणाची विशेषत: शेततळ्यांची कामे प्राधान्याने राबवावीत. पीएम किसान योजनेत महसूल विभागाशी समन्वय साधून प्रलंबित प्रकरणे असल्यास तत्काळ निपटारा करावा, खरिपाच्या तयारीच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने खत, बियाणे, आदी तजवीज ठेवावी, असे निर्देश ना. भुसे यांनी पाचही जिल्ह्यांतील कृषी अधिकाऱ्यांना दिले.