लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुकुंज (मोझरी) येथून गुरूवारी महाजनादेश यात्रा प्रारंभ झाली. यानिमित्ताने जिल्हाभरात पोस्टर, होर्डिंग्ज लागले आहेत. मात्र, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होर्डिंग्जमध्ये हेतूपुरस्सर टाळण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ भीम बिग्रेडने जिल्हा कचेरीसमोरील होर्डिंग्ज लक्ष्य करून कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी भीम ब्रिगेडच्यावतीने शासनाविरूद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली.भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात भाजप शासनाने डॉ. आंबेडकरांप्रती घेतलेल्या भूमिकेचा निषेध नोंदविला. महाजनादेश यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी लावलेल्या होर्डिंग्ज, पोस्टरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा वगळून अन्य महामानवांची प्रतिमा अंकित आहे. त्यामुळे भाजपची डॉ. बाबासाहेबांप्रती असलेली आस्था बेगडी असल्याचा आरोप राजेश वानखडे यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या होर्डिंग्ज, पोस्टरवर लोकमान्य टिळक, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, राष्टसंत तुकडोजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा अंकित आहे. त्यामुळे भाजप केवळ बाबासाहेबांच्या नावाचा राजकीय वापर करीत असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे वानखडे म्हणाले. निवडणूक आली की ‘भीमशक्ती- शिवशक्ती’चे नारे द्यायचे आणि दलित मते घेऊन राजकारण करायचे हे भाजपचे षड्यंत्र आहे. भाजपचे नेते, मंत्रीगण यांनी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा मुद्दामपणे महाजनादेश यात्रेच्या होर्डिंग्ज, पोस्टरवर अंकित केली नाही, असा आरोप भीम बिग्रेडने केला. भाजपला डॉ. आंबेडकर नकोसे आहे तर निवडणुकीत त्यांची प्रतिमा कशाला वापरता, असा सवाल वानखडे यांनी उपस्थित केला. यावेळी नीलेश मोडके, गुणवंत हरणे, ऋषिकेश उके, अतुल चवरे, नितीन काळे, आकाश सावळे, विक्रम तसरे, प्रकाश पाटील, नीलेश बोडखे आदी उपस्थित होते.
कृषिमंत्र्यांच्या पोस्टरला फासले काळे, शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 1:34 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुकुंज (मोझरी) येथून गुरूवारी महाजनादेश यात्रा प्रारंभ झाली. यानिमित्ताने जिल्हाभरात पोस्टर, होर्डिंग्ज लागले आहेत. मात्र, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होर्डिंग्जमध्ये हेतूपुरस्सर टाळण्यात आली.
ठळक मुद्देभीम ब्रिगेड आक्रमक : महाजनादेश यात्रेच्या होर्डिंग्जवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नाही