गजानन मोहोड, अमरावती: मनमानी कारभार व असमाधानकारक शासकीय कामकाजामुळे चांदूरबाजार येथील कृषी अधिकारी (विघयो) पूनम सुरेश औंधकर यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.
चांदूर बाजार पंचायत समितीमध्ये औंधकर यांनी शासकीय योजना राबविण्यात हयगय करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना शासकीय लाभापासून वंचित ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. याशिवाय अनधिकृत गैरहजर राहणे, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, कार्यालयामध्ये स्वमर्जीने विलंबाने उपस्थित राहणे आदी नित्याच्या सवयीमुळे शासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने सीईओंनी निलंबनाची कारवाई केलेली आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय अचलपूर पंचायत समिती राहणार आहे.