२२ कोटींचा निधी मंजूर : बुडीत क्षेत्रातील गावांबाबत अज्ञानराजेश मालवीय धारणीमहाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील तापी, सिपना नदीवर तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणासाठी शासनाने २२ कोटी रूपये मंजूर केले आहे. मात्र तापी खोरे पाटबंधारे महामंडळाने बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या गावांबद्दल अद्यापपर्यंत स्पष्ट माहिती जनतेला कळविली नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये भीती निर्माण झाली आहे. तापी प्रकल्पाला विरोध नाही. मात्र प्रकल्पाच्या नावावर आदिवासींची दिशाभूल करून त्यांचे गावे बुडीत क्षेत्रात घेतल्यास आंदोलन करून वेळप्रसंगी तुरुंगातही जाण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दिला आहे. मेळघाटच्या धारणीलगत तापी व सिपना नदीच्या संगमावर सात हजार कोटी रूपये खर्चून तापी मेगा रिचार्ज प्रकल्प साकारला जाणार आहे. पूर्वी जमिनीवरून सर्वेक्षणाला राजकुमार पटेल यांनी प्रखर विरोध करून सर्वेक्षण बंद पाडल्यामुळे शासनाने हवाई सर्वेक्षणासाठी २२ कोटी रूपये मंजूर करून हवाई सर्वेक्षण जून/जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे सुचविले आहे. मात्र शासनाने तापी मेगा रिचार्ज प्रकल्पात परिसरातील किती गावे बुडीत क्षेत्रात जाणार, अशी कोणतीही माहिती लेखी स्वरूपात मेळघाटच्या जनतेला कळविली नसल्यामुळे आदिवासी नागरिक बुडीत क्षेत्राच्या भीतीमुळे त्रस्त झाले आहेत. शासनाने फक्त ४ लाख ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे सांगितले. मात्र वेळेवर प्रकल्प परिसरातील महाराष्ट्र व मध्यप्रदेशचे कोणतेही गाव बुडीत क्षेत्रात जाण्याचे संकेत दिसत आहे.मेळघाटात कोट्यवधींचे सिंचन प्रकल्पांचा भडीमार सुरू असून या सिंचन प्रकल्पांचा मेळघाटच्या शेतकऱ्यांना कोणताही फायदा होण्याची शक्यता नाही. आजही शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकलपासाठी पूर्ण पाणी हे जळगाव खान्देशकडे वळते होणार असल्याने या प्रकल्पाचाही कोणताच फायदा स्थानिकांना होणार नाही, हे विशेष.तापी प्रकल्पाला विरोध नाही. मात्र आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीसह गावेही बुडीत करून येणाऱ्या काळात आदिवासी कोरकू संस्कृती व आदिवासींना मेळघाटातून पुनर्वसनाचा शासनाचा व नेत्याचा डाव असेल तर ते कदापी सहन करणार नाही. वेळप्रसंगी मेळघाटच्या आदिवासींना घेऊन उग्र आंदोलन करून तुरुंगातही जाण्यास मागे हटणार नाही.- राजकुमार पटेल,माजी आमदार (मेळघाट).
तापी प्रकल्पासाठी होणार हवाई सर्वेक्षण
By admin | Published: June 20, 2015 12:44 AM