- मोहन राऊत
अमरावती - जन्म, मृत्यू, शाळा, शेती अशा कोणत्याच दाखल्यावर ज्यांच्या जातीचा उल्लेख नाही, असे एकाच गावातील २५ कुटुंब ‘अजात’ नावाने आजही ओळखले जातात. अजातीनेही जातीचा अंत होऊ शकला नसल्याची व्यथा धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील त्या २५ कुटुंबातील सदस्य बोलून दाखवितात. ‘पुरोगामी महाराष्ट्रा’त सध्या सुरू असलेला जातीय आरक्षणाचा संघर्ष पहिला की, जातीचा अंत तर दूरच, उलट जातीय अस्मिता अधिक टोकदार झाल्याचे जाणवते. अशावेळी आठवण होते ती धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील गणपती महाराजांची, ज्या एकाच गावातील २५ कुटुंब अजात आहेत. विदर्भात विशेष म्हणजे अभेद्य अशा वर्ण व्यवस्थेतून जातींचे बुरुजे उभे असतानाच्या स्वातंत्रपूर्व काळात जातिअंताची ही चळवळ उभी केली मंगरूळ दस्तगीर या मुंडांच्या गावात गणपती ऊर्फ हरी महाराज या अवलियाने. १९१५ ते १९३५ या दोन दशकात जात मोडण्याची मोहीम चालली. आपल्या सहका-यांपासून तर अनुयायापर्यंत जात सोडण्याचा आग्रह त्यांनी धरला. ‘अजात’ होण्याचा मंत्र दिला. गणपती महाराज हे वारकरी संप्रदायाचे होते. ज्या चंद्रभागेच्या काठावर जातीपातीच्या पलीकडे जाऊन वैष्णवजण विठुनामाच्या जयघोषाने पंढरी दणाणून सोडतात, तोच गजर गणपती महाराजांना गावागावांत हवा होता. यासाठी त्यांनी १९२५ च्या काळात मंगरूळ दस्तगीर गावात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभारले. त्यांच्या अनुयायांनी ‘अजात’ चळवळ पुढे सुरू ठेवली. शाळांमध्ये आपल्या मुलींचे नाव टाकताना जातीचा रकाना मोकळा सोडला. मात्र, काळ बदलत गेला आणि जातीच्या रकान्यात ‘अजात’ हा उल्लेख आला. यामुळे ही सामाजिक सुधारणा होण्याऐवजी सामाजिक समस्या बनली. गणपती महाराज यांनी चालवलेली चळवळ आज काही प्रमाणात कायम आहे. आमच्या २५ कुटुंबाच्या दस्तावेजावर जातीचा उल्लेख नाही. आमची अजात म्हणून असलेली नोंद आजही कायम आहे. - श्याम भबुतकर, गणपती महाराज यांचे नातू, रा. मंगरूळ दस्तगीर