एक मत कोरे : अचलपूर बाजार समितीवर ‘समता’चा झेंडानरेंद्र जावरे अचलपूरअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अजय पाटील टवलारकर तर उपसभापतीपदी ईश्वरचिठ्ठीने कुलदीप काळपांडे यांची बुधवारी झालेल्या निवडणुकीत निवड झाली. समता पॅनलचा झेंडा बाजार समितीवर फडकताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी बुधवारी दुपारी २ वाजता मतदान घेण्यात आले. समता पॅनलतर्फे सभापतीपदासाठी अजय पाटील टवलारकर यांनी तर सहकार पॅनलतर्फे राजा पाटील टवलारकर यांनी नामांकन दाखल केले होते. समता व सहकार पॅनलमध्ये प्रत्येकी नऊ उमेदवार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात बाजार समितीची निवडणूक औत्सुक्याचा विषय ठरली होती. आ. बच्चू कडू व अजय पाटील टवलारकर यांच्या समता पॅनलने आठ जागांवर विजय मिळविला तर अपक्ष कुलदीप काळपांडे यांनी समर्थन दिल्याने संचालकांची संख्या नऊ झाली होती. बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक आहेत. बबलू देशमुख व वासंतीताई मंगरोळे यांच्या सहकार पॅनलने सुध्दा नऊ जागांवर यश संपादन केले होते. दोन्हीकडे समसमान संख्या झाली होती. ही निवडणूक त्यामुळेच बरीच रोचक ठरली. कोरी मतपत्रिका, अजय पाटील विजयी बाजार समिती सभागृहात बुधवारी सभापती व उपसभापतीपदासाठी मतदान घेण्यात आले. समता पॅनलतर्फे अजय पाटील टवलारकर तर सहकार पॅनलतर्फे राजाभाऊ टवलारकर यांनी नामांकन दाखल केले होते. नऊ ही समसमान संख्या संचालकांची होती. ईश्वरचिठ्ठी होणार, अशी सर्वांची अपेक्षा असताना सभापतीपदासाठी चक्क एक मतपत्रिका कोरी निघाल्याने समता पॅनलचे अजय पाटील टवलारकर सभापतीपदी नऊ मते मिळवून विजयी ठरले तर सहकार पॅनलचे राजाभाऊ टवलारकर यांना आठ मते मिळाली. एक मतपत्रिका कोरी निघाली. शेतकऱ्यांचा विश्वास जिंकायचा आहे. विश्वासाने, चांगुलपणाने व सभ्यतेने राजकारण करावे लागते. समता -प्रहार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमांचे फळ आहे. - बच्चू कडूआमदार, समता पॅनल प्रमुखआर्थिक व्यवहार झाला आहे. संशय कुणावर घ्यायचा हा संशोधनाचा विषय. कोणी कोरे मत टाकले, हे शोधून त्याला त्याची जागा दाखविण्यात येईल. - बबलू देशमुखसहकार पॅनल प्रमुख
अजय टवलारकर सभापती, कुलदीप काळपांडे उपसभापती
By admin | Published: September 03, 2015 12:02 AM