अमरावती : दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाट अडवत मागण्यांचे निवेदन दिले. यात दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या, अशी मागणीदेखील करण्यात आली होती. यावर तुम्हाला आरक्षण देऊन आम्ही काय खुरपायला जायचे काय, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी आंदोलकांना केला.
त्यांच्या या उत्तरावर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी ते अमरावतीत आले होते.
‘तुम्हीही निवडणूक लढा’
प्रहार संघटनेने दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. अजित पवार यांनी दिव्यांगांच्या सर्व प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत तत्काळ योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश दिले. जनतेचा जर तुम्हाला पाठिंबा असेल, तर तुम्हीसुद्धा निवडणुकीत उभे राहू शकता, असा सल्ला देण्यासही ते विसरले नाही.
आम्ही दिव्यांगांच्या प्रश्नांवर अजित पवार यांना निवेदन दिले. परंतु दिव्यांगांच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यामुळे आम्ही निषेध नोंदवितो - बंटी रामटेके, महानगरप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष