अमरावती - विरोधी पक्ष नेते अजित पवार शनिवारी मेळघाट दौऱ्यावर धारणी तालुक्यात जात असताना ते ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर सेमाडोह नजीकच्या भवई गावाजवळ दोन ट्रक फसल्याने हा मार्ग शुक्रवारी रात्री १० वाजता पासून पूर्णतः बंद झाल्याने वाहतूक थांबली आहे.
अमरावती परतवाडा धारणी इंदूर असा हा आंतरराज्य महामार्ग आहे. सेमाडोह नजीकच्या भवई गावानजीक टँकर नादुरुस्त झाल्याने अडकला होता बाजूच्या उर्वरित मार्गातून जड वाहतूक करणारा ट्रक काढण्याचा प्रयत्न केला असता तोही अडकला. त्यामुळे शुक्रवारी रात्री दहा वाजता पासून हा मार्ग पूर्णता ठप्प पडला आहे, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले तर वाहतूक ठप्प असल्याचे स्थानिक रहिवासी संदीप भारवे व भोला मावस्कर यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.
दादांना जावे लागणार चिखलदरा मार्गे?
विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार धारणी तालुक्यातील कलमखार, भोकरबर्डी या गावांना भेटी देणार आहे. परतवाडा- सेमाडोह हा आंतरराज्य महामार्ग असून त्या व्यतिरिक्त परतवाडा धामणगाव गढी चिखलदरा- सेमाडोह- धारणी असा दुसरा पर्यायी मार्ग आहे, पण तो फेराचा व घाट वळणाचा अधिक असल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना वाहतूक वेळेपर्यंत सुरळीत न झाल्यास या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.