बडनेरा : अकोला राष्ट्रीय महामार्गाचा अरुंद रस्ता प्रामुख्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अत्यंत धोक्याचा ठरत आहे. चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या, असे वाहनचालकांमध्ये संतप्तपणे बोलले जात आहे. हल्ली अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत.
दोन ते अडीच वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी बडनेरा ते अकोला महामार्ग अर्धा खोदून ठेवला आहे. कंत्राटदार कामे सोडून गेल्याने या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम थांबले होते. अलीकडेच कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, बडनेरा शहरापासून जवळच असणाऱ्या याच महामार्गावरील लोणी तसेच जवळपासच्या खेड्यांतील नागरिक बडनेरा, अमरावती शहरात दररोज कामानिमित्त येतात. मात्र, चौपदरीकरणाच्या कामामुळे अरुंद असणारा रस्ता या सर्वांसाठी अत्यंत धोक्याचा झाला आहे. रात्रीच्या वेळी गाडी खड्ड्यात जाते की काय? अशी भीती असते. दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला कमीत कमी रस्ता दिसेल, असे काही प्रयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला केवळ पोते ठेवण्यात आले. त्यावरचे स्टिकर्स गायब झाले. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. नागपूरहून मुंबई, पुणे या मुख्य शहरांकडे याच मार्गावरून जावे लागतात. त्यामुळे सारखी वाहनांची वर्दळ असते. अकोला महामार्गावरील चौपदरीकरणाला गती द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
अरुंद रस्ता, भरधाव वाहने
अकोला महामार्गावर अर्ध्या रस्त्याचे खोदकाम झाल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. वाहने भरधाव धावतात. दुचाकीस्वारांना प्रचंड धोका पत्करून या महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. स्त्यावर खड्डे आहेत. रस्त्याच्या खाली उतरताना वाहन घसरेल आणि भरधाव येणारे मागील वाहन धडक मारेल का? ही भीती दुचाकीस्वारांना सतावत आहे. तेव्हा प्रशासनाने अरुंद रस्ता दुचाकीस्वारांसाठी कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.