चिखलदरा (अमरावती) : गतवर्षीच्या फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा खून झाल्याचा खळबळजनक उलगडा डीएनए अहवालावरून झाला आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री एकाविरूध्द खून व खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. चिखलदरा पोलिसांनी ४ एप्रिल २०२२ रोजी खटकाली जंगलातून जप्त केलेली मानवी हाडे व बेपत्ता महिलेचा मुलाचा डीएनए जुळल्याने या खुनाची उकल झाली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात हा उलगडा करण्यात आला.
भारती विष्णू नागोर (४२, रा. अकोली जहांगिर, ता. अकोट, जि. अकोला) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी विष्णू धर्मे (३६, अकोली जहागीर, ता. अकोट) याला अटक करण्यात आली. त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या खटकाली परिसरात जंगलात वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना मानवी हाडे सापडली होती. सबब, पोलीस आणि वन विभागाने त्यावेळी सहा किलोमीटर जंगल पिंजून काढले. त्यात कवटी उर्वरित हाडे सापडली. त्याबाबत ९ एप्रिल २०२२ रोजी चिखलदरा पोलिसांनी मर्ग दाखल केला.
असा झाला उलगडा
दरम्यान, त्या अनुषंगाने बेपत्ता इसमांची माहिती घेतली असता, १७ फेब्रुवारी २०२२ पासून भारती विष्णू नागोरे ही बेपत्ता असल्याची फिर्याद अकोट पोलीस स्टेशनमध्ये नोेंदविली गेल्याचे समोर आले. त्यावरून चिखलदरा पोलिसांनी खटकाली जंगलातून जप्त केलेली मानवी कवटी व भारती हिचा मुलगा परशुराम यांचे डीएनए नमुुने चाचणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल डिसेंबर २०२२ मध्ये प्राप्त झाला. ती मानवी कवटी व परशुरामचा डीएनए जुळून आला.
सहा किलोमीटर जंगल पिंजून काढले
अकोट वन्यजीव विभागाच्या खटकाली परिसरात वन कर्मचारी गस्तीवर असताना ४ एप्रिल २०२२ रोजी त्यांना मानवी कवटी, हाडे, कपडे सापडले. याची माहिती चिखलदरा पोलिसांना देण्यात आली. ४० ते ५० संख्येत असलेल्या वन व पोलीस अधिकाऱ्यांनी जंगल पिंजून काढले होते. पाच ते सहा किलोमीटर परिसरात एक एक अवयव हाडे सापडत गेली होती.
नेमके काय आहे प्रकरण
भारतीच्या नातेवाईक व मुलाला पोलिसांनी विचारपूस केली. त्यावरून भारती नागोरे व गावातील अमोल धर्मे यांचे अनेक वर्षापासून फोनवर बोलणे व संबंध होते. त्यांच्यात काही दिवसांपुर्वी काही कारणास्तव वाद झाला. नंतर देखील त्यांचे बोलणे आणि संभाषण सुरू होते. भारती ही अमोल धर्मे याला लग्न करण्यासाठी बोलत होती. अमोल धर्मे यानेच तिचा खून करून तिचे प्रेत जंगलामध्ये टाकले असल्याची फिर्याद तिच्या मुलाने नोंदविली.
डीएनएवरून महिलेची ओळख पटली. फिर्यादीवरून खून व पुराव नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
- राहुल वाढवे ठाणेदार चिखलदरा