लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणात २३ सप्टेंबर रोजी ९९.६४ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे सर्व १३ दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून १०५३ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात होत आहे. या तेराही दरवाजातून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० एवढी आहे. २३ सप्टेंबर रोजी या धरणामध्ये ३४२.४८ मीटर पाणीसाठा झाला आहे. पहिल्यांदाच ११ सप्टेंबर रोजी पाच दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली होती. परंतु, धरणात पाण्याचा येवा वाढत असल्याचे पाहून त्याच दिवशी रात्री ११ वाजता धरणाची १३ दरवाजे उघडण्यात आली होती. गुरुवारी सकाळपर्यंत सहा दरवाजे उघडी ठेवण्यात आली होती. मात्र, मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने आवक वाढत गेली. सध्या अप्पर वर्धा धरणाची निर्धारित लेव्हल व धरण १०० टक्के पूर्णत्वास जात असल्याचे पाहून तेराही दारे उघडून मोठ्या प्रमाणात विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तेराही गेटमधून सोडण्यात येणारे पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पर्यटक कुटुंबकबिल्यासह धरणातून उडणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी येत आहेत. दरम्यान, अप्पर वर्धा धरणाच्या पुलावरून एक युवक काही दिवसांपूर्वी नदीपात्रात वाहून गेला होता. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अप्पर वर्धा धरण परिसरात मोर्शी पोलीस ठाण्याच्यावतीने बॅरिकेड लावण्यात आले आहेत.धरणाचे अधिकारी व बीट अंमलदार राहुल वानखडे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
अप्पर वर्धाची सर्व दारे पुन्हा उघडली, धरण ९९.६४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 5:00 AM