अमरावती/ वर्धा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५४, तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले होते. जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसवले होते. सत्तेत बसण्याचा आमचा अधिकार नव्हता. तरीही आपण विकासाच्या मुद्द्यावर विचारधारा बाजूला ठेवून हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली. मग २०२३ मध्ये आम्हीही विकासासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, तर तो चुकीचा कसा, अशा थेट प्रश्न खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी नवचेतना महासभेतून खा. शरद पवार यांना केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरावती, वर्धा येथे रविवारी मेळाव्यांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बाेलत हाेते. पटेल म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढण्यासाठी छगन भुजबळ आणि आपण स्वत: विशेष प्रयत्न करीत आहोत. जालना येथील घटनेची चौकशी होत दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मराठा आरक्षणाचा तांत्रिक अडचणींचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. तो निकाली निघावा यासाठी प्रयत्नही होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
वर्धा येथील दादाजी धुनिवाले मठाच्या सभागृहात आयोजित परिवर्तन मेळाव्याला सुरेश चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, क्रांती जांबुवंतराव धोटे, तर अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील सभेला आ. अमोल मिटकरी, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, महिला नेत्या सुरेखा ठाकरे, वसंत घुईखेडकर, आदी नेतेमंडळी उपस्थित होती.