चिखलदरा : आदिवासी विकास महामंडळ व प्रकल्प कार्यालयाकडून वितरित केल्या जाणाऱ्या खावटी अनुदानाचे वाटप अद्यापही चिखलदरा तालुक्यात सुरू झालेले नाही. मेळघाट विधानसभेचे माजी आमदार तथा आदिवासी विकास महामंडळाचे संचालक केवलराम काळे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटून खावटी प्रकल्पाच्या अनुदानाबद्दल मागणी केली.
मेळघाट विधानसभा अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील अद्यापही खावटी अनुदान मिळाले नाही. त्यामुळे आदिवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे, तर काहींच्या नावाची कागदपत्रे दिल्यावरही नोंदणी अद्याप झालेली नाही. चिखलदरा तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले मागील दोन-तीन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शाळेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सदर कामे लवकरात लवकर मार्गी लावून आदिवासी बांधवांचे प्रश्न व अडचणी सोडवाव्या, अशी मागणी माजी आमदार केवलराम काळे यांनी धारणी येथील प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांना केली आहे.