कलावंताची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हाभरातील मंगल कार्यालय, लॉन्स, हाॅल येथे कार्यक्रमालाही मनाई करण्यात आला. परिणामी यावर आधारित घटकांचा विचार करता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालये, हॉल, लाॅन्स आदींना क्षमतेनुसार ५० टक्के लोकांच्या उपस्थितीची परवागी द्यावी, अशी मागणी गुरुवारी आर्टिक्ट वेलफेअर सोसायटी अंतर्गत संगीत कलावंत, मंगल कार्यालय संचालक, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स चालकांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
गत मार्च वर्षापासून कोरोना संकट सर्वत्र ओढवले आहे. याची जाणही सर्वांना आहेच. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्हाभरातील कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे मंगलकार्यालय, हॉल, लॉन्स आदी ठिकाणी लग्न समारंभ कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे. परिणामी यावर आधारित असलेले संगीत कलावंत व अन्य घटकांचा रोजगार बंद असल्यामुळे या घटकातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हॉटेल्स, मॉल, एसटी बसेस यांना ज्याप्रमाणे मुभा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर लग्न समारंभाच्या कार्यक्रमासही आसन क्षमतेनुसार ५० टक्के लोकांच्या उपस्थितीची परवागी द्यावी, अशी मागणी कलावंत शैलेश शिरभाते, मनीष आत्राम, वीरेंद्र गावंडे, सुधीर वानखडे, शुभम मानकर, मनीष उमेकर, सोमेश्र्वर हरले, आकाश सारवान, विक्रम धिमान, प्रशांत ठाकरे, रामकुमार धामंदे, रामेश्र्वर काळे, सविता पडोळे, शीतल तायडे, अंजली ठाकरे, पिंटू बोके, कमलेश बिजोर, विशाल पांडे, राजकुमार निभोंकर, योगेश चौधरी, संदीप चावरे आदींनी केली आहे.