लोकमत न्यूज नेटवर्कवनोजा बाग : विदेशी क्लिक्सन कंपनीला १०४ वर्षे शकुंतला रेल्वेचा मालकी हक्क दिला. आता ती मुदत संपली असताना हा रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी रेल्वे या विषयातील पारंगत तथा तज्ज्ञ ग्यानेश मदन माहुलेंना संधी द्या, एक महिन्याची परवानगी द्या, आम्ही रेल्वे चालवून दाखवतो, असा निर्धार विजय विल्हेकर यांनी व्यक्त केला. शकुंतला एक्स्प्रेस बचाव सत्याग्रहच्यावतीने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा येथे २३ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्यावतीने ही रेल्वेगाडी आहे त्या स्थितीत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून अचलपूर ते यवतमाळ रेल्वे मार्गावरील गावांमध्ये जनजागरण, पदयात्रा व रेल्वे स्थानक स्वच्छता करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर, मूर्तिजापूर, लाखपुरी, कापूसतळणी, अचलपूर, पथ्रोट, शिंदी बु. येथे विजय विल्हेकर यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले. कोकर्डा येथे शनिवारी शकुंतला नॅरोगेजची तांत्रिक बाजू समजून घेण्याच्या उद्देशाने या विषयातील तज्ज्ञ ज्ञानेश मदन माहुले यांना निमंत्रित केले होते. ज्येष्ठ सत्याग्रही गजानन देवके यांनी त्यांचा परिचय दिला. यावेळी ग्यानेश यांना ‘लोहशिल्पकार’ हा किताब बहाल करण्यात आला.ग्यानेश माहुले हे मदन इंजिनिअरिंग वर्क्सचे मुख्य संचालक मालक आहेत. त्यांच्या निर्माण केलेल्या रेल्वे इंजिनना देशविदेशात प्रचंड मागणी आहे. त्यांना हेरिटेज अभियांत्रिकीमध्ये रस आहे. त्यांच्याकडे नॅरोगेजचे स्टीम इंजिनसह अनेक पुरातन वस्तू संग्रही आहेत. शेगावच्या आनंद सागरमधील वैभवी रेल्वे ही त्यांचीच निर्मिती आहे. मलेशिया, सौदी अरेबियातदेखील त्यांचे इंजिन धावत आहेत. यावेळी सत्याग्रही म्हणून लक्ष्मण कुले, लाखनवाडी येथील सरपंच विवेक देशमुख, अनंत पानझाडे, नीलेश जामोदकर, सौरभ माहुरे, वैभव काकड, शुभम घाटे, निखिल आसोलकर, पवन काठोळे, हृषीकेश साबळे, पुरुषोत्तम बुरघाटे, बंटी काकड, स्वराज माहुरे, किरण साबळे, चेतन इसळ, बाबाराव खंडारे, संतोष वर्धे, वंदना खंडारे, ज्योती वर्धे, विशाखा खंडारे, सीमा खंडारे, रूपाली खंडारे आदी उपस्थित होते. यावेळी गावातून फेरी काढून प्रतीकात्मक शकुंतला एक्स्प्रेस रेल्वे इंजिन फिरवण्यात आले.