अमरावती : जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात माल विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी १५ मे रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्रकाश साबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे फळे व भाजीपाला दुधाची नासाडी होत आहे. अशा परिस्थिती फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून आहे. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी गत वर्षापासून शासन व प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. अशातच आता लॉकडाऊनचा कालावधी १५ ते २२ मे पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे फळे व भाजी मार्केट सुध्दा बंद राहणार आहे. परिणामी जिल्ह्यातील भाजी व फळ उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे बाजारात आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करणे थोडेफार शक्य आहे. परंतु फळ उत्पादकांना फळे मंडइत आणून विकता येत नसल्याने शेतातील फळे शेतातच सडत आहेत. ही फळे नाशिवंत असल्यामुळे येत्या आठवडाभरात तोडून विकता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुन्हा २२ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे फळे व भाजीपाला उत्पादकांची परिस्थिती अतिशय हलाखीची होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही विशिष्ट ठिकाणी व्यापाऱ्यांना फळे विकत घेण्याची परवानगी द्यावी, त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचा सातबारा उतारा घेऊन व सर्व सुरक्षा ठेवून शहरात मनपाच्या परवानगीने माल विक्रीस मुभा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकाश साबळे व शेतकऱ्यांनी केली आहेे.