अमरावती : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत सुरू करण्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी उशिरा परवानगी दिली. याचसोबत कृषी साहित्य विषयक दुकानेदेखील सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसे आदेश बुधवारी जारी करण्यात आले.
संचारबंदीच्या काळात सर्व बाजार समित्या बंद असल्याने आगामी पेरणीकरिता शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याबाबत डीडीआर संदीप जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती. त्याला अनुसरून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील फळबाजार, भाजीबाजार व धान्य खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी स्वतंत्र नियोजन करून बाजार समित्यांद्वारा वेळ ठरवावी लागणार आहे. शेतकऱ्यांना टोकन देण्यापूर्वी बाजार समित्यांना शेतकऱ्यांशी संपर्क करावा लागेल व टोकन दिल्यानंर शेतकऱ्यांना बाजार समितीत गर्दी करता येणार नाही. टोकननुसारच यावे लागणार आहे.
फळबाजार व भाजीपाला यार्डमधील व्यापाऱ्यांना कामाची जागा निर्जंतुकीकरण करावी लागणार आहे. येथे फक्त घाऊक विक्री करावी लागेल. सर्वांना त्रिसूत्रीचे पालन करावे लागेल. याशिवाय सर्वांची रॅपीड ॲन्टिजन टेस्ट करावी लागणार आहे. हे आदेश २१ मे पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
बॉक्स
कृषी केंद्रांना सकाळी ७ ते दुपारी २ पर्यत परवानगी
खरीप हंगामाचे पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रे, कृषी अवजारांची दुकाने, कृषी साहित्य संबंधित दुकाने, कीटकनाशक विक्री केंद्र, यांना नियमित विक्रीकरीता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत मुभा दिली आहे. सद्यस्थितीचा विचार करात अधिकाधिक व्यवहार बांधावर खते व ऑनलाईन व्यवहार तसेच भौतिक संपर्क न येता करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वाची रॅपीड अॅन्टिजन टेस्ट करण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.