अमरावती : राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत (एनकॅप) घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेचा देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने यासंबंधीचे सर्वेक्षण देशातील विविध ९४ शहरांमध्ये केले होते. यामध्ये ‘३ ते १० लाख लोकसंख्येचे शहर’ या वर्गवारीत महापालिकेने बाजी मारत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत सन २०२३-२४ मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शहरांचे विविध मापदंडात सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवहन मंत्रालयामार्फत महापालिकेला देशात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून गौरव मिळाला आहे. या वर्गवारीत प्रथम आलेल्या अमरावती महापालिकेला ७५ लाखांच्या बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. हा निधी शहराच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार यांनी दिली.