अमरावती : रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे एक तास अंबानगरीच्या रस्तोरस्ती शहर पोलिसांच्या ‘सायक्लोथॉन’ची धूम राहिली. शालेय विद्याथ्यांसोबतच प्रशासनातील उच्चाधिकारी व अमरावतीकर‘सायक्लोथॉन’मध्ये सहभागी झाले. शहर पोलिसांच्या आयोजनाला सायकलस्वारांच्या भरगच्च उपस्थितीने चारचांद लावले.
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी सकाळी आठ वाजता 'सद्भावना सायक्लोथॉन' यासह 'मेरी मिट्टी मेरा देश', हर घर तिरंगा व 'आजादी का अमृत महोत्सवाच्या समारोपा'निमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील मैदान येथून मान्यवरांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. रॅलीला अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महापालिका आयुक्त देविदास पवार व पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष संजय खोडके यांनी रॅलीमध्ये सायकल चालून उपस्थितांचा उत्साह वाढविला.
पोलीस कवायत मैदानापासून सकाळी आठ वाजता सायकल रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त निधी पांडेय, पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके आदी उपस्थित होते. ‘सायक्लोथॉन’ची जबाबदारी पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सागर पाटील यांच्याकडे होती. ती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. पोलीस अधिकारी, ठाणेदार व कर्मचारी देखील ‘सायक्लोथॉन’मध्ये सहभागी झाले.
पाच व दहा किलोमिटरचा रूट१८ वर्षापर्यंतच्या वयोगटाचा सहभाग असलेल्या पाच किलोमिटर रॅलीची सुरूवात पोलीस कवायत मैदानापासून झाली. चपराशी पुरा, बियाणी चौक, आयुक्त कार्यालय मार्गे वेलकम टी पाईंटपर्यंत गेली. तेथून परत याचमार्गे कवायत मैदानात रॅलीचा समारोप झाला. तर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी दहा किलोमिटरचा रूट होता. या सायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅली मार्गांवरील मुख्य चौकात देशभक्तीपर गीत वाजवून रॅलीचे स्वागत करण्यात आले. तसेच मार्गावर जातांना व येतांना 'भारत माता की जय' घोषणाचे स्वर निनादत होते. सायकलस्वारांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर पोलीस पोलीस कवायत मैदान येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.