निषेध रद्द : बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून काढता पायअमरावती : आमदार रवी राणा आणि समर्थकांनी भाजप कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा अंकित असलेले फ्लेक्स काढून फेकल्यामुळे त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी गाजावाजा करून इर्विन चौकात एकत्रित आलेल्या भाजपजनांना आंबेडकरवाद्यांपुढे नरमावे लागले. तगड्या पोलीस बंदोबस्तात महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपजनांनी काढता पाय घेतला. दुपारी ३ वाजता राणांच्या कृत्याचा इर्विन चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध केला जाणार असल्याचे निरोप भाजप कार्यालयातून त्यांच्या समर्थकांनी आणि प्रसिद्धी माध्यमांना धाडले गेले. भाजपजन पोहोचण्यापूर्वीच बेनोडा जहागीर येथील क्रांतिसूर्य युवक समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यानजिक उपस्थित होते. काही महिला आणि मोजके युवक असा हा केवळ पंधरा ते वीस व्यक्तींचा गट होता. भाजपजन पोहोचताच, ही पवित्र जागा आहे. तुम्हाला येथे निषेध करता येणार नाही. बाबासाहेब आमचे श्रद्धास्थान आहे. तुम्हाला निषेध करायचा असेल तर आधी तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारावा. त्यानंतरच या जागेवर उभे राहून काय तो निषेध करण्याचा हक्क तुम्हाला सांगता येईल. प्रवीण पोटे आणि रवि राणा यांच्यातील राजकारणात बाबासाहेबांचा पुतळा असलेल्या या पावन स्थळाचा गैरवापर आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका क्रांतिसूर्य युवक समितीने घेतली. तुम्ही ही जागा सोडून रस्त्यावर निषेध करू शकता, असा पर्यायदेखील त्यांनी उपलब्ध करून दिला. सत्तेत असलेल्या भाजपला असा अनपेक्षित अवरोध निर्माण झाल्याने प्रथम ते आवाक् झाले. नंतर आम्ही येथेच निषेध करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलीस पाचारण केले गेले. चौक घेरला गेला; तथापि भीमप्रेमी त्यांच्या भूमिकेवर ताठर होते. पोलिसांनी भीमप्रेमींना रस्त्याच्या त्या बाजूला नेले. तिकडे हे सुरू असताना छायाचित्रकारांच्या सांगण्यावरून छायाचित्रे काढून घेण्यापुरते भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रवीण पोटे जिंदाबाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम्, भारत माता की जय, असे नारे लगावले. प्रकरणावर पडदा, भाजपचा निर्णयदोन दिवसांपासून सुरू असलेल्या निषेध-निदर्शनांसह वाक्युद्धावर अधिकृतरीत्या पडदा टाकल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली. याबाबत शनिवारी सायंकाळी भाजप ग्रामीणच्यावतीने प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. आ.राणा यांनी पालकमंत्र्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह भाष्यामुळे सामाजिक सौदार्ह धोक्यात आले होते. हे सामाजिक सौदार्ह अबाधित राखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याची घोषणा भाजपच्यावतीने करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. भाजपच्या अस्मितेशी कोणीही खेळू नये, असा इशाराही दिलेला आहे.
आंबेडकर अनुयायांपुढे भाजपजन नरमले !
By admin | Published: April 17, 2016 12:02 AM