फोटो पी २३ मोर्शी
पान २ ची बॉटम
मोर्शी : तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी आता नव्या अज्ञात रोगामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असून, अनेक संत्रा बागा फळविहरित होत आहेत. गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे, असा प्रश्न संत्रा उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानाचे सर्वेक्षण करून कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
तालुक्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा झाडे आहेत. दोन बहरांचे उत्पादन येथे घेतले जाते. यामध्ये आंबिया बहर जानेवारीमध्ये येतो, तर मृग बहर मृग नक्षत्रामध्ये निसर्गावर अवलंबून असतो. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने दडी दिल्याने मृग बहराचे संत्रा पीक आले नाही. मात्र, डिसेंबरपासून तापमानात वाढ झाल्याने पाण्याचा ताण दिलेल्या संत्राझाडांवर आंबिया बहर चांगला फुलला होता. उन्हाळ्यात अतिउष्ण तापमान असतानासुद्धा संत्राउत्पादकांनी पाण्यासारखा पैसा खर्च करून आंबिया बहर टिकविला. मात्र, अल्पशा अवकाळी पावसामुळे बुरशी, फायटोप्थोरा तसेच देठतुटीसह अज्ञात रोगांनी थैमान घातल्याने आंबिया बहराला मोठ्या प्रमाणात गळती लागली. ओल्या दुष्काळामुळे संत्राउत्पादकांच्या हातचे नगदी पीक जाण्याची शक्यता बळावली आहे. फळांचा सडा दिवसागणिक शेतकऱ्यांची चिंता वाढवित असल्याने या गंभीर प्रकाराबाबत कृषी विभाग व संशोधक मंडळी उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
संत्रावर डिंक्या?
डिंक्या रोग्यामुळे झाडाला पडणाऱ्या छिद्रातून चिकट द्रव बाहेर पडतो. झाडांची पाने सुकायला लागतात. या रोगाला अटकाव करण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व दिलासा देण्याची गरज आहे, अन्यथा शेतकरी वर्ग देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. कृषी विभाग व संशोधक मंडळींनी संत्राउत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून संत्राबागांना भेटी देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.