बेलोरा : शासकीय धान्य घेऊन निघालेला ट्रक रुग्णवाहिकेला कट मारल्यानंतर उलटल्याने मागे बसलेल्या मजुराचा मृत्यू झाला. चांदूर बाजार ते कोंडवर्धा मार्गावर दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, मो. जाकीर मो. सादीक (३२, रा. शिरजगाव बंड) असे मृत मजुराचे नाव आहे. तो एमएच ३४ एम ५५४१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये शासकीय धान्याच्या पोत्यांवर मागे बसला होता. शे. नाजीम शे. हुसेन (३०, रा. चांदूर बाजार) हा ट्रक चालवित होता. त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या तळवेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एमएच २७ एए ५०३३ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला ट्रकचालकाने कट मारला. नरेश मेटांगे (३२) हे रुग्णवाहिका तळवेल येथे परत नेत होते. कट मारल्याने अनियंत्रित झालेला ट्रक काही अंतरावर उलटला. त्याखाली दबून मो. जाकीर याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच चांदूर बाजारचे ठाणेदार सुुनील किनगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दादाराव पंधरे, जमादार वीरेंद्र अमृतकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रुग्णवाहिकेला कट, ट्रक उलटून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:10 AM