फोटो - भगोले ०५ पी
५० दिवसांपासून दुरुस्ती सुरू, गंभीर रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न
प्रभाकर भगोले
चांदूर रेल्वे : आरोग्य विभागाच्यावतीने रुग्णांकरिता जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. तथापि, चांदूर रेल्वे ग्रामी रुग्णालयाला मिळालेली रुग्णवाहिका ४९ दिवसांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बेपत्ता आहे. पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आलेली नसल्याने गंभीर रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
शासनाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णांची मोफत ने-आण करते. ही रुग्णवाहिका अनेकांसाठी जीवनदान देणारी ठरली आहे. मात्र, चांदूर रेल्वे शहरात गेल्या ४९ दिवसांपासून सदर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे शक्य होत नाही. काही रूग्णांना तर वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे जीवसुद्धा गमवावा लागत असल्याचे चित्र आहे. अमरावती मार्गावर चांदूर रेल्वेच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्यामुळे गेल्या १६ जुलैपासून ती दुरुस्तीकरिता पाठविण्यात आली आहे. मात्र, अजून ती दुरुस्त झाली नसून तात्पुरती व्यवस्थासुद्धा ४९ दिवसांपासून संबंधित आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही.
तालुक्यात अपघात किंवा गुन्हेगारी घटना घडल्यास जखमींसाठी तातडीने शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होत नसून आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णवाहिका पोहोचायला तब्बल एक ते दोन तासांचा कालावधी लागल्याचे काही प्रसंगांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे तात्काळ तात्पुरती रुग्णवाहिकेची सोय करण्याची मागणी होत आहे.
---------------
साहस संस्थेने केली मागणी
चांदूर रेल्वे येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे याबाबतचा पाठपुरावा साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेने केला आहे व तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी संबंधित प्रशासनाकडे केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांनी दिली.
-----------
चांदूर रेल्वे येथील रुग्णवाहिकेचा अपघात झाल्यानंतर ती दुरुस्तीकरिता पाठविण्यात आली आहे. दुरुस्तीकरिता वेळ लागत आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत दुसरी रुग्णवाहिका तात्पुरती उपलब्ध करून देणार असल्याची माहिती
- डॉ. नरेंद्र अब्रुक, जिल्हा व्यवस्थापक, ॲम्ब्युलंस
----------------