नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाटातीलआरोग्य यंत्रणा कुपोषणासाठी सज्ज, हेच ब्रीदवाक्य घेऊन कार्य सुरू असल्याचा कांगावा नेहमी केला जातो. दुसरीकडे मात्र अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट ४५ किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. यात संबंधित डॉक्टर म्हणतात ती गाडी गॅरेजमध्ये ब्रेक नादुरुस्त व इतर दुरुस्तीसाठी उभी होती, हे विशेष
कुपोषणाचा कलंक असलेल्या मेळघाटात उन्हाळ्यापासूनच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या सर्व प्रकारच्या आजारापर्यंत नियोजन केले जाते. दुसरीकडे मेळघाटात गर्भवती व इतर अपघाती रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याचे वास्तव चित्र आहे. सतत त्याची ओरड सुरू असते; परंतु अति दुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमएच २७ एए ५१३१ क्रमांकाची रुग्णवाहिका सोमवारी आपल्या कार्यक्षेत्रात बाहेरील कोयलारी येथील सोमेश्वर भोले मंदिरात नवसाच्या पूजेसाठी भक्तांना घेऊन आली होती. दुपारी बारा वाजता आलेली ही रुग्णवाहिका सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान परत गेली असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगलसिंग धुर्वे व गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मेळघाटात ठिकठिकाणी नवसाची पूजा
राज्यात बोकड व पशूंच्या नवस बळीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत बंदी आहे. मात्र, मेळघाटातील नागरिक परंपरागत पूजाअर्चा व नवसाची पूजा देतात, त्यामुळे चिखलदरा येथील देवी पॉइंट कोयलारी येथील सोमेश्वर मंदिर आदी अनेक ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे.
सोमवार व गुरुवारी नवस यात्रा
कोईलारीपासून पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सोमेश्वर मंदिर आहे, परिसरातील नागरिक सोमवार व गुरुवारी तेथे नवसाची पूजा देतात. किमान ५० ते ६० बोकडांचा बळी दिला जातो.
डॉक्टर म्हणतात दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये
४५ किमी अंतरावर हतरू आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राबाहेर रुग्णवाहिका कोयलारी येथे नवसाच्या पूजेसाठी दिवसभर उभी होती. प्रत्यक्षात गाडी परतवाडा येथे गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी असल्याचे व गाडीचे ब्रेक निकामी असल्याचीही सांगण्यात आले. चालकाचा हा जीवघेणा प्रकार संताप व्यक्त करणारा आहे.
सोमवार, दि. ३० मे रोजी दुपारी बारा ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोयलारीपासून एक किलोमीटर अंतरावर मंदिरावर नवसाच्या यात्रेसाठी हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका उभी होती.
मंगलसिंग धुर्वे, शिवसेना तालुकाप्रमुख चिखलदरा
सोमवारी मीटिंग असल्याने आपण अचलपूर येथे होतो. संबंधित वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये होते. त्याचे ब्रेक निकामी झालेले आहेत. तरी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.
डॉ. केशव कंकाळ, हतरू आरोग्य केंद्र