अमरावती : आमदार रवी राणा यांच्या मालकीच्या भानखेडा शिवारातील गोडाऊनमधून अज्ञात चोराने ॲल्युमिनियमचे भोंगे, एम्प्लिफायर तथा किराणा साहित्य चोरून नेले. ४ सप्टेंबर रोजी रात्री ही घटना उघड झाली असून, याप्रकरणी गोडाऊनकिपरच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
गोडाऊनकिपर सुशील ठाकूर यांच्या तक्रारीनुसार, आमदार रवी राणा यांच्या मालकीचे भानखेडा शिवारात शेत असून, तेथे दोन गोडाऊन आहेत. त्या दोन गोडाऊनमध्ये गरिब, गरजुंना वाटण्यासाठी किराणा साहित्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास सुशील ठाकूर हे त्या भानखेडा गोडाऊनमध्ये गेले असता, त्यांना दाराची जाळी तुटलेली दिसली. तथा किराणा साहित्य अस्तव्यस्त दिसले. त्या चोरीची माहिती आमदार राणा यांना देखील देण्यात आली. पाहणी केली असता किराणा साहित्यासह तब्बल ५ लाख ५८ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त एम. एम. मकानदार व बडनेराचे ठाणेदार बाबाराव अवचार यांनी घटनास्थळी भेट दिली.
काय चोरले चोराने
१.५५ लाख रुपयांचे खाद्यतेल, ६०० किलो साखर, ५०० पॅकेट चना डाळ, १०० साड्या, ॲल्युमिनियमचे ३७ भोंगे, ६३ एम्प्लिफायर, ५८ जीओ टॅग युनिट असा एकुण ५.५८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. चोरीची ही घटना १९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान घडली, असे तक्रारीत नमूद आहे.