- उज्वल भालेकर अमरावती - राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यात मोतीबिंदू असलेल्या जवळपास २६३० ज्येष्ठ नागरिकांची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील नेत्र विभागाने दिली.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मोतीबिंदूचा त्रास असलेल्या जवळपास ३ हजार रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला देण्यात आले होते. सुरुवातीला ही मोहीम १९ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत राबविण्याचे निर्देश दिले होते; परंतु यानंतर ९ मार्चपर्यंत या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली होती.
मोतीबिंदूचा त्रास हा प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येत असल्याने ही मोहीम ५० वर्षांवरील नागरिकांसाठी राबविण्यात आली होती. जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया या जिल्हा सामान्य रुग्णालय ( इर्विन ) या एकमेव शासकीय रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांमध्येदेखील मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे २० दिवसांमध्ये २ हजार ६३० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम ९ मार्चपर्यंत राबविण्यात आली. यासाठी जिल्ह्याला ३ हजार शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले होते. यामध्ये २ हजार ६३० शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून जवळपास ८८ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.- डॉ. संतोष भोंडवे, नेत्र विभागप्रमुख, इर्विन