अमरावती : जगभरात २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याच दिवशी आपल्या घरामध्ये नव्या सदस्याचे आगमन झाल्याने या कुटुंबाचा आनंद हा द्विगुणित करणारा ठरला आहे. शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे याच दिवशी ३० बालकांचा जन्म झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यावेळी बाळ जन्मलेल्या या कुटुंबांतील सदस्यांनी आपल्या जन्मलेल्या मुलाचे नाव गौतम, सिद्धार्थ, तर मुलगी जन्मलेल्या कुटुंबांनी आपल्या मुलीचे नाव गौतमी, महामाया, अम्रपाली, यशोधरा असे ठेवणार असल्याचा मानस ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म हा वैशाख पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे जगभरात वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. बुद्धांनी दु:खाचे कारण शोधत जगाला शांतीचा मार्ग दिला. यंदा २३ मे रोजी भगवान गौतम बुद्धांची २५६८ वी जयंतीदेखील सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. काही कुटुंबासाठी हा दिवस आनंद द्विगुणित करणारा ठरला आहे. डफरीन रुग्णालयात पौर्णिमेच्या २४ तासांच्या कालावधीमध्ये २९ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये नैसर्गिक १०, तर सिझेरियन १९ प्रसूती झाल्या. यामध्ये या महिलांनी एकूण ३० बाळांचा जन्म झाला आहे. एका मातेने जुळ्यांना जन्म दिला असून, या सर्व बाळांची तसेच त्यांच्या मातांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
१९ बाळांचा जन्म सिझेरियन
डफरीन रुग्णालयात बुद्ध पौर्णिमेला १९ मातांची प्रसूती ही सिझेरियन झाली असून, त्यांनी १९ बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये ११ मुले तर ८ मुलींचा जन्म झाला, तर १० महिलांची प्रसूती नैसर्गिक झाली असून एका मातेने जुळ्यांना जन्म दिल्याने एकूण ११ बाळांचा जन्म झाला. यामध्ये २ मुले, तर ९ मुलींचा जन्म झाला आहे.
सर्वाधिक १७ मुलींचा जन्म झाला
डफरीन रुग्णालयात २३ मे बुद्ध पौर्णिमेला एकूण ३० बाळांचा जन्म झाला. यामध्ये सर्वाधिक १७ मुली, तर १३ मुलांचा जन्म झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
"२३ मे रोजी रुग्णालयात एकूण २९ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये १० महिलांची प्रसूती नैसर्गिक, तर १९ सिझेरियन प्रसूती झाली. या महिलांनी एकूण ३० बाळांना जन्म दिला असून, एका मातेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे," अशी माहिती डफरीन रुग्णालयाचे डॉ. अरुण साळुंके, यांनी दिली.